'पक पक पकाक्' या मराठी सिनेमानंतर अभिनेत्री नारायणी शास्त्री 'काजळी' सिनेमाद्वारे मराठीत पदार्पण करणार असल्याच्या बातमीनंतर आता ती छोट्या पडद्यावरही पुनरागमन करणार असल्याची बातमी आहे. 'फिर सुबह होगी' हा नारायणीचा नवीन शो पुढील महिन्यात सुरू होणार आहे. नारायणी सध्या मुंबईपासून दूर वाईमध्ये या शोच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. छोट्या पडद्यावरील पुनरागमनाबाबत 'लोकमत'शी बोलताना नारायणी म्हणाली की, मी केवळ एक ब्रेक घेतला होता, जो माझ्यासाठी आवश्यक होता. करिअर सुरू झाल्यापासून मी बरीच वर्षे कामात व्यस्त राहिल्याने कुटुंबासाठी वेळ देऊ शकत नव्हते. आता पुनरागमन करताना प्रसन्न वाटतेय. शोबाबत नारायणी म्हणाली की, हा शो मध्य प्रदेशमधील एका जमातीच्या जीवनपद्धतीवर आधारित आहे. इथे पुरुषांनी काम न करण्याची परंपरा असल्याने स्त्रिया नाच—गाणे करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतात. आपण यात गुलाबी नावाच्या स्त्रीचे पात्र साकारल्याचे नारायणीने सांगितले. हे पात्र स्त्रीशक्तीची ताकद दाखवणारे असल्याचे नारायणी मानते.
No comments:
Post a Comment